Delhi Elections Results : दिल्ली विधानसभा (Delhi Vidhansabha) निवडणुकीचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. २७ वर्षांनंतर भाजपला (BJP) सत्ता मिळण्याची चिन्हे दिसत असली, तरी अंतिम निकालानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. काँग्रेसचा या निवडणुकीत मोठा पराभव होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीतील नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर प्रतिक्रिया देत, दिल्लीत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू केल्याचा आरोप केला आहे.
गेली पाच वर्ष अरविंद केजरीवालांना (Arvind Kejriwal) काम करू दिले नाही. नायब राज्यपालांच्या हातात संपूर्ण ताकद दिली. सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल. हा फॉर्म्युला महाराष्ट्रात झाला. दिल्लीत (Delhi Elections Results) झाला आता बिहारमध्ये दिसत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झाले असते तर ही परिस्थिती आली नसती, असा खोचक टोलाही राऊत यांनी काँग्रेसला लगावला. आप आणि काँग्रेस यांचे स्पर्धक भाजप असल्याचे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विचार करावा, ते अजून राष्ट्रीय नेते झालेले नाहीत. राहुल गांधी (Rahul Gandhi) राष्ट्रीय नेते आहेत. तुम्ही बोगस मतदान करून जिंकले म्हणून नेता झाला आहात,” असा आरोप त्यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस हे बोगस मतदान करून जिंकलेले नेते”
“महाराष्ट्रात ३९ लाख मतदार वाढले आणि त्यातील बहुतांश मते भाजपलाच कशी मिळाली? ही कोणती जादू, कोणते अघोरी कृत्य आहे, हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे,” असा सवाल राऊतांनी केला. तसेच, “एकनाथ शिंदेंकडे अघोरी विद्या व जादूटोणा आहे, त्यांच्याकडेच विचारा. तुम्ही बोगस मतदान करता आणि आम्हाला ज्ञान देता,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली