Uddhav Thackeray । राज्यात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर विविध कारणांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात. यामुळे अनेकदा राजकीय वातावरण देखील चिघळलेले असल्याचे पाहायला मिळते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी नुकतेच प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी गंगा स्नान देखील केले होते. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे रेनकोट घालून आंघोळ करतात, अशी टीका भाजपवाले करत होते. पण आता बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगास्नान केले जात आहे. पण गंगेमध्ये डुबकी मारत असताना आपला रुपयाही डुबत आहे, याकडेही लक्ष द्यावे,” असा सल्ला ठाकरे यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “निवडणुका झाल्यानंतर पाच लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे. आता कुठे गेले ते देवाभाऊ, जॅकेटभाऊ, दाढीभाऊ? लाडक्या बहिणी हुशार आहेत, त्यांना कोण फसवा आहे आणि कोण खरा आहे, हे चांगेलच समजते. तरीही या लाडक्या बहिणींनी जर यांना मतदान केले असेल तर त्यांना फसवून घेतलेली मते परत करणार का,” असा संतप्त सवाल देखील ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे यांच्या टीकेमुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरे गट विरुद्ध नरेंद्र मोदी असा संघर्ष निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. यावर आता नरेंद्र मोदी आणि महायुती सरकार काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरते.