Kisan Andolan : शेतकरी आंंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

Kisan Andolan : शेतकरी आंंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

Kisan Andolan : ठोकलेले खिळे, लोखंडी तारांचे कुंपण, काँक्रीटचे बॅरिकेडिंग, खोदलेले रस्ते, ड्रोनद्वारे पाळत, कंटेनरची भिंत आणि सुरक्षा दलांचा पहारा, हे दृश्य भारत पाकिस्तान बॉर्डरचे नाही तर दिल्लीच्या सर्व सीमांचे आहे. हे करायचे कारण काय म्हणाल तर पंजाब (Punjab) हरियाणा (Haryana) मधील शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत, मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या (Delhi) दिशेने निघाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन (Kisan Andolan)आता पंजाब,
हरियाणा सोबत उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. मंगळवारी जेव्हा हे शेतकरी पंजाब हरियाणा च्या शंभू बॉर्डरवर (Shambhu Border) दाखल झाले, त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्ली मध्ये घुसन्यापासून रोखलं. या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यामुळे हे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पण शेतकरी पुन्हा आंदोलनाला का बसले आहेत. आणि शेतकऱ्यांच्या मागण्या नक्की काय आहेत.

Kisan Andolan

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत

किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजेच हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या (Swaminathan Commision) शिफारशी लागू कराव्यात, आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे, कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला आणि मांसाची आयात कमी करावी, आयात शुल्कात वाढ करावी, ५८ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी; दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्यावे, शेतजमिनींचे संपादन २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार करावे, केंद्र सरकारने भूसंपादनाबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्यावा, भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे, पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करून शेतकरी हिश्श्याचे हप्ते सरकारने भरावे, नुकसानीचे मूल्यांकन शेतकरीनिहाय करावे आदी मागण्यांसाठी प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे.

आता हमीभावाची मुख्य मागणी का? हमीभाव का महत्वाचा आहे

किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव एक अशी व्यवस्था आहे, ज्याद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल एका ठरावीक किमतीत खरेदी करण्याची हमी देते. केंद्र सरकारने संबंधित शेतीमालाला जो हमीभाव जाहीर केला, त्यापेक्षा कमी दराने संबंधित शेतीमालाची विक्री सुरू असल्यास तो शेतीमाल केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करण्याचे बंधन या कायद्यात असते. त्यामुळे हा कायदा शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतीमालाला हमीभावाने विक्रीची खात्री देतो. सध्या केंद्र सरकार देशभरातील एकूण २३ प्रकारच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी करते. त्यात प्रामुख्याने भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, मोहरी, तूर आणि कापूस या शेतीमालांचा समावेश आहे. केंद्र सरकारही अनेकदा हमीभावाने खरेदी करणे टाळते. पण हमीभावाचा
शेतकऱ्यांना फारसा फायदा होतो, असे नाही.

या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नेमक्या काय?

केंद्रीय
कृषी मूल्य आयोगाने तीन सूत्रे निश्चित केली आहेत. त्यानुसार हमीभाव ठरतो. हे पहिले सूत्र आहे. या सूत्रानुसार बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च उत्पादन खर्च म्हणून गृहीत धरला जातो. दुसरे सूत्र आहे एफएल या सूत्रानुसार शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे श्रम उत्पादन खर्चात मोजले जाते. केंद्र सरकार आज जो हमीभाव जाहीर करते ते एफएल, या सूत्रानुसार निश्चित केला जातो. भारतरत्न दिवंगत कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांनी हमीभाव देताना व्यापक अर्थाने उत्पादन खर्च गृहीत धरण्याची शिफारस केली होती. त्यांनी एफएल या दोन सूत्रांच्या समावेशासह तिसरे सूत्र मांडले होते, त्यामध्ये बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम या सोबतच शेतीत जी गुंतवणूक केली जाते, त्या पैशांवरील व्याज, शेतजमिनीचे भाडे निश्चित करून त्या आधारे उत्पादन खर्च ठरवला पाहिजे. हमीभाव ठरवताना हा सर्व खर्च उत्पादन खर्च म्हणून धरावा आणि त्यात पन्नास टक्के भर घालून उत्पादन खर्च मिळावा, अशी शिफारस स्वामिनाथन यांनी केली होती. देशातील शेतकरी संघटना यासाठी कायम आग्रही असतात. सरकार सुद्धा स्वामिनाथन यांच्या शिफारशीनुसार हमीभाव दिल्याचे सांगते. पण, प्रत्यक्षात सरकार उत्पादन खर्च कमी दाखवते. त्यामुळे प्रत्यक्षात सर्वंकष उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, असा हमीभाव मिळत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

पंजाब आणि  हरियाणा मधील शेतकरीच आंदोलनात जास्त सहभाग का घेतात

आता काही लोकांच्या मनात एक प्रश्न सारखा येतो की पंजाब, हरियाणा आणि सोबतच मध्य प्रदेशमधील शेतकरीच आंदोलनात जास्त सहभाग का घेतात तर देशात जास्त करून पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश येथे हमीभावाचे
मोठे लाभार्थी शेतकरी आहेत. देशात गहू, भात उत्पादनात पंजाब, हरियाणा आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. गव्हासह मोहरी, मसूरसह अन्य कडधान्यांच्या उत्पादनातही मध्य प्रदेश आघाडीवर आहे. मोहरी प्रामुख्याने मध्य प्रदेशातच होते. दर वर्षी सरकार सरासरी ४०० लाख टन गहू खरेदी करते. त्यात सर्वाधिक वाटा पंजाब, मध्य प्रदेश आणि हरियाणाचा असतो. मध्य प्रदेशातून गहू, मोहरी, हरभरा, मसूरची खरेदी करते. त्यामुळे हमीभाव, हमीभाव कायदा यासाठी पंजाब, हरियाणातील शेतकरी प्रचंड आग्रही असतात. आणि त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांची सुद्धा मदत मिळते. राजधानी दिल्लीच्या सीमेला लागून असल्यामुळे पंजाब, हरियाणातील संघटना दिल्लीची कोंडी करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याच्या मनस्थितीत असतात.

भूसंपादनाचा २०१३चा कायदा काय आहे? 

देशात ब्रिटिशांनी १८९४ला भूसंपादनासाठी पहिला कायदा केला. या कायद्यात अनेक त्रुटी असल्या, तरीही २०१३पर्यंत याच कायद्यानुसार भूसंपादन केले जात होते. या कायद्यातील त्रुटी कमी करून, नवा भूमी संपादन पुनर्वास आणि पुनर्वसन कायदा २०१३मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच जुलै २०१५ मध्ये एक अध्यादेश काढून २०१३ च्या कायद्यात बदल केला होता. २०१३ च्या कायद्यात सरकारी कामांसाठी, खासगीसार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी जमीन घेताना संबंधित जमीनमालकांपैकी ८० टक्के लोकांची संमती आवश्यक होती. मोदी सरकारने अध्यादेश काढून ही अट काढून टाकली होती. त्यासोबत संपादन करताना होणाऱ्या सामाजिक परिणामांचा आणि देशाच्या अन्नसुरक्षेचा मुद्दाही काढून टाकला होता. देशातील विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांसह खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ आदी संघटनांनी विरोध करून, प्रामुख्याने सुपीक, बागायती जमिनीचे संपादन करण्याऐवजी नापीक ओसाड जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी केली होती. सर्व स्तरांतून झालेल्या विरोधामुळे मोदी सरकारला आपला अध्यादेश मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून राज्यांना राज्यनिहाय, प्रकल्पनिहाय भूसंपादनाबाबत विविध सूचना दिल्या जात आहेत, असा आरोप आंदोलक करीत आहेत आणि २०१३ च्याच भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन करण्याची मागणी करीत आहेत.


By. UnCut मराठी Team

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *