Jacqueline Fernandez Money Laundering Case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) कॉनमन सुकेशच्या (Sukesh Chandrashekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे. ईडीच्या नव्या दाव्यांमुळे अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने कथित फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरच्या गुन्ह्यातील रक्कम जाणूनबुजून स्वीकारली आणि त्याचा वापरही केला, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयासमोर केला आहे.
![]() |
Jacqueline Fernandez Money Laundering Case |
जॅकलिनच्या याचिकेला उत्तर देताना दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने हा युक्तिवाद केला होता. याचिकेत अभिनेत्रीने सुकेश चंद्रशेखर याच्याविरोधातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
हे प्रकरण न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांच्यासमोर सूचीबद्ध करण्यात आले आणि जॅकलिनच्या वतीने वकिलाने ईडीच्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली आहे. आपल्या उत्तरात, ईडीने दावा केला आहे की जॅकलिन फर्नांडिस हिने सुकेश चंद्रशेखरसोबतच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सत्य कधीच उघड केले नाही आणि पुरावे मिळेपर्यंत तथ्ये नेहमी लपवून ठेवली.
रिपोर्ट्सनुसार, ईडीने म्हटले आहे की, ‘जॅकलीन सुरुवातीपासूनच स्वत:ला निर्दोष आणि पीडित म्हणवत होती, पण सुकेशने तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात तिने काहीही सादर केले नाही.’ ईडीचे म्हणणे आहे की जॅकलिनला सुकेशच्या गुन्ह्याबद्दलची माहिती होती, तिला लीना मारिया ही त्याची पत्नी असल्याचेही माहीत होते, तरीही तिने सुकेशसोबतचे नाते सुरू ठेवले.
By. Trupti S.