आजचा लेख जरा भावनिक आहे कारण असली दृश्ये मला तरी बघवणार नाहीत. कारण भारताचे नाव जगभरात गाजवलेल्या या महिला पहिलवानांना आज कुस्ती सोडावी लागली. साक्षी मलिकने मीडिया समोर आपले बूट काढून ठेवले आणि कुस्तीला रामराम ठोकला. गेली कित्येक वर्ष कुस्तीच्या आखाड्यात लढल्या आणि जिंकल्या देखील, पण जेव्हा न्यायाच्या लढाईची वेळ आली तेव्हा अभिनंदन आपण त्यांना हरवल.
एका माणसाच्या मागे पूर्ण सिस्टम, पूर्ण शक्ति असताना या मुलींनी आपल्यावर अन्याय झालाय हे जेव्हा बोलून दाखवले तेव्हा तुमच्या मधल्या कित्येक लोकांनी त्यांची साथ सोडली. जेव्हा त्यांना आपल्या समर्थनाची गरज होती तेव्हा आपण त्यांना प्रसिद्धी साठी हपापलेले, जातीयवाद करणारे काहींनी तर देशद्रोही ठरवुन मोकळे झाले. देशासाठी पदक जिंकणारे खरच देशद्रोही असू शकतात का? असा प्रश्न पडलाय का तुम्हाला…. कदाचित काही लोक खुश असतील की या खेळाडूंना न्याय मिळाला नाही, आणि सत्तेतला माणूस अजूनही मोकाट फिरतोय. या असल्या माणसांमुळे माणुसकीला काळिमा फासली जातेय आणि तुम्ही आम्ही फक्त बघतोय.
तर झालंय असं की ब्रिजभूषण सिंग या खासदारावर विनेश फोगट साक्षी मलिक यांच्यासह अठरा ते वीस महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तकरार केली होती. त्यांच्याविरोधात त्यांनी चाळीस दिवस दिल्लीत आंदोलन केल होत. एवढ करूनही त्या माणसाविरुद्ध कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, शिवाय क्रिडा मंत्र्यांनी ऑन कॅमेरा मीडिया समोर ब्रिजभूषण च्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीला अध्यक्षपदी बसवणार नाही अस घोषित केलं होते. पण आता भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्याच समर्थकाची नियुक्ती झालीये.
संजय सिंग हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले त्यानंतर भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत चमकावणाऱ्या महिला पैलवान साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. दोन्ही खेळाडूंनी कुस्ती चे मैदान सोडण्याची घोषणा केली. ज्याचे परिणाम संपूर्ण कुस्ती क्षेत्रात बघायला मिळणार आहेत कारण ही अशी नावे आहेत ज्यांनी कुस्तीमध्ये खूप नाव कमावलंय. ज्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत, 40 दिवस दिल्लीत आंदोलन करुनही, त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल, तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असं म्हणत साक्षी मलिक ढसाढसा रडली. आणि पूर्ण देशाला भावनिक केल. आम्ही जिंकू शकलो नाही. पूर्ण भावनेने आम्ही लढाई लढलो. पण महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सारखी व्यक्ती, त्यांचा सहकारी जिंकून येत असेल, तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते, यापुढे मी कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही. देशवासियांना धन्यवाद!. अशा भावना तीने कुस्ती सोडताना बोलून दाखवल्या.
कोण आहे ब्रिजभूषण सिंग आणि त्यांच्यावर आरोप काय?
ब्रिजभूषण सिंह हे राजकारणात खूप दबंग नेते मानले जातात. अनेक वादांमध्ये ते अडकले आहेत पण भारतीय कुस्ती मध्ये त्यांचा खूप दबदबा आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष, उत्तरप्रदेश च्या कैसरगंजमधून भाजप खासदार आणि राज ठाकरेंनी माफी न मागितल्यास अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी जाहीर धमकी देणारे हे नेते. तब्बल सहा वेळा खासदार झालेले गृहस्थ. पण ज्या कुस्ती महासंघाचे ते अध्यक्ष होते त्याच कुस्तीतल्या माजी ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी, वर्ल्ड चॅम्पियन्सनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं होतं. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळासह इतर गंभीर आरोप केले होते.
18 जानेवारी 2023 ला विनेश, साक्षी आणि बजरंग पुनियानं दिल्लीच्या जंतरमंतरवर पहिल्यांदा आंदोलनाला सुरुवात केली आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तेव्हाचे अध्यक्ष आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे खासदार ब्रिज भूषण शरण सिंग यांच्यावर सात महिला पैलवानांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. कोर्टाच्या आदेशानंतर ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल झालं. त्यात POCSO कायद्याची कलमंही आहेत कारण ज्यावेळी शोषण झाले तेव्हा एक पीडिता अल्पवयीन होती.
ब्रिजभूषण सिंगने संधी मिळताच महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितल होत आणि त्यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याच कोर्टात सांगितल होत. पण अजूनही ती केस तशीच धूळखात पडून आहे.
कुस्ती सोडली आता पुढे काय?
40 दिवसांच आंदोलन, मारहाण सहन करून देखील या खेळाडूंना त्यांना न्याय देण्यात आपण कमी पडलो असच म्हणाव लागेल. 2016 च्या ऑलिंपिक्स मध्ये जेव्हा भारताच्या नावापुढे शून्य पदके होती तेव्हा साक्षी मलिकेने देशासाठी पदक जिंकून देशाचा झेंडा फडकवला होता. तिच्या पदकाचा रंग कोणता होता ते कधीच महत्वाच असू शकत नाही, पण तिने देशासाठी काहीतरी करून दाखवले आणि जेव्हा देशाकडून तिला न्याय पाहिजे होता तेव्हा देशाने तिला न्याय मिळून दिला नाही. कारण एक माणूस खेळापेक्षा, खेळाडूंपेक्षा मोठा झाला होता.
देशात या खेळाडूंना न्याय कसा मिळेल हे माहीत नाही. आज कुस्तीचे भवितव्य अंधकारमय आहे, हे अतिशय दुःखद आहे. त्यांचा लढा सरकारशी कधीच नव्हता. पण यांची शक्ती आणि त्यामागे असलेली संपूर्ण यंत्रणा साऱ्या देशाने पाहिली. आधी पदके नदी मध्ये सोडून द्यायला निघालेले खेळाडू आता त्यांना दिलेला सम्मान देखिल परत करत आहेत. बजरंग पुनिया ने त्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा खेळाडू आंदोलनाला बसणार अस दिसतय. कदाचित आता तरी त्यांना साथ द्या. कारण त्यांच्यावर आलेली वेळ कदाचित आपल्यावर देखील येऊ शकते.